Headlines

वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

शेतात मशागत करताना काळाचा घाला; परिसरात हळहळ

उरुळी कांचन प्रतिनिधी : वळती (ता. हवेली) येथे शेतात मशागत करत असताना ट्रॅक्टर तालीवरून पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार,( ता. ४ सप्टेंबर) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. सोपान केरू कुंजीर (वय ५६, रा. वरचा मळा, वळती, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोपान कुंजीर हे स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरने शेतात मशागत करत होते. यावेळी ट्रॅक्टर तालीवरून अचानक पलटी झाला. या दुर्घटनेत सोपान कुंजीर हे ट्रॅक्टरखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे पुतणे आदेश कुंजीर, जितेंद्र दत्तात्रय कुंजीर तसेच इतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रॅक्टरखालून सोपान कुंजीर यांना बाहेर काढले.

या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली होती. नातेवाईकांनी त्यांना चारचाकी वाहनातून उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल, उरुळी कांचन येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या दुर्दैवी घटनेमुळे वळती परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुंजीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *