Headlines

‘लोकसंवाद-२०२६’मध्ये पोस्टाच्या सुरक्षित गुंतवणूक योजनांची माहिती

सुरक्षित गुंतवणुकीसह पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सुरक्षित बचत आणि गुंतवणुकीसाठी भारतीय डाक विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून नागरिकांनी आपल्या गरजेनुसार पोस्टाच्या या योजनांची माहिती घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन बारामती हेड पोस्ट ऑफिसचे मार्केटिंग अधिकारी विकास गाढवे यांनी केले.

पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना आणि सेवांची माहिती देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आझाद तरुण मंडळ ट्रस्ट, इंदापूर चौक येथे आयोजित संवाद कार्यक्रमात श्री. गाढवे मार्गदर्शन करत होते. यावेळी पोस्टमास्तर लालासाहेब जाधव तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बचत खाते, आवर्ती ठेव, मुदत ठेव, मासिक प्राप्ती योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि किसान विकास पत्र आदी योजनांची माहिती देण्यात आली. ३० सप्टेंबरपर्यंत लागू असलेल्या व्याजदरानुसार बचत खात्यावर ४ टक्के, पाच वर्षांच्या आवर्ती ठेवीवर ६.७० टक्के, तर मुदत ठेवीवर कालावधीनुसार ६.९० ते ७.५० टक्के व्याजदर असल्याचे श्री. गाढवे यांनी सांगितले.

पाच वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर ७.७ टक्के, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर ७.१० टक्के आणि किसान विकास पत्रावर ७.५० टक्के व्याजदर आहे. पाच वर्षांच्या मासिक प्राप्ती योजनेवर ७.४ टक्के व्याजदर असून ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८.२ टक्के व्याजदर आहे. या योजनेत कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी योजनेवर ८.२ टक्के व्याजदर असून या योजनेत वर्षाला कमाल १ लाख ५० हजार रुपये जमा करता येतात, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांचीही यावेळी माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत १८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्तींना वार्षिक २० रुपये प्रीमियममध्ये अपघाती विमा संरक्षण मिळते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तींना वार्षिक ४३६ रुपये प्रीमियममध्ये २ लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण उपलब्ध आहे. अटल पेन्शन योजनेत १८ ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांना योगदानानुसार निवृत्तीनंतर १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शनची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजना आणि सेवांची माहिती थेट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमातील मार्गदर्शनामुळे नागरिकांना पोस्टाच्या विविध बचत, गुंतवणूक आणि सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती समजण्यास मदत झाली. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार योजनांची सविस्तर माहिती घेण्यासाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा डाक सेवा मोबाइल ॲपचा वापर करावा, असे आवाहन श्री. गाढवे यांनी केले.

या मार्गदर्शन कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पोस्टाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *